Take a fresh look at your lifestyle.

अर्ज दाखल करण्यापूर्वीच निलेश लंकेच्या मागे महसूल यंत्रणेचा ससेमीरा ! निलेश लंकेचा विखे कुटुंबावर मोठा आरोप

लोकसभा निवडणूकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वीच विखे – पिता पुत्रांनी आपल्या मागे महसूल यंत्रणेचा ससेमीरा लावला असून हा सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी केला. शासकीय अधिकारी चोविस तास व्हिडीओ कॅमेरे घेऊन आपल्या पाठीमागे ठेवण्यात येत असल्याचे लंके म्हणाले..

नीलेश लंके यांना राजकीय प्रवाहात ठेवायचे की बाहेर काढायचे याचा अधिकार पारनेरच्या जनतेला आहे, विखे यांना नाही असेही लंके यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा निघोजमध्ये पोहचल्यानंतर झालेल्या सभेत लंके हे बोलत होते. ते म्हणाले, पारनेरची जनता स्वाभिमानी आहे. पारनेरचा खासदार म्हणजे तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती खासदार असल्याचा अभिमान प्रत्येकाला असणार आहे. मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात स्वाभिमान यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

कर्जत – जामखेडच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य देण्याचा शब्द दिला आहे. असे असताना आपण कर्जत जामखेडच्या मागे पडलो तर ते योग्य होणार नाही. पारनेर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. जनता जनार्दनाचा आशिर्वाद आपल्या पाठीशी असल्याने एक लाखांपेक्षा अधिकचे मताधिक्य आपणास तालुक्यातून मिळाले पाहिजे अशा पध्दतीने नियोजन करण्याचे आवाहन लंके यांनी केले.

विखे परिवाराने पारनेर तालुक्यातील जनतेसाठी काय दिले याचे उत्तर त्यांनी द्यावे. आम्ही मंजुर करून आणलेली कामे आडवून तालुक्याच्या विकासाला ब्रेक लावण्याचे पाप विखे यांच्याकडून करण्यात येत असून विखे यांच्याऐवढा लबाड पुढारी कोणी पाहिला नाही. दादा कळकमर म्हणाले, नीलेश लंके यांची उमेदवारी ही पारनेर तालुक्याची अस्मिता आहे. त्यामुळे पारनेर तालुका त्यांना सर्वाधिक मताधिक्य देणार आहे. सन २०१९ च्या निवडणूकीत आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरात विखे यांना ५५ हजारांची आघाडी देऊन मिलिभगत केल्याचा आरोपही कळमकर यांनी केला.

यावेळी नितीन अडसूळ, अर्जुन भालेकर, सुदाम पवार, शिवाजी जाधव, बाळासाहेब पुंडे, दत्तात्रय म्हस्के, शिवाजी लंके, बाळासाहेब लंके, दिलीप ढवण, मंगेश लंके, विश्वास शेटे, विकास शेटे, सुनील वराळ, शांताराम लाळगे, वसंत ढवण, दत्तात्रय लंके, सचिन लंके, सोन्याबापू भापकर, किसन रासकर, डॉ. आबासाहेब खोडदे, सुवर्णा धाडगे, शिवाजी औटी, बाळासाहेब दिघे, राजू आघाव, खंडू भुकन, बाबाजी तनपुरे, राहुल सुकाळे, ठकाराम लंके, रूपेश ढवण यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रा. ज्ञानेश्वर कवाद व सोमनाथ वरखडे यांनी सुत्रसंचलन केले.

सन १९९९ मध्ये स्व. गुलाबराव शेळके यांनी मा. खा. स्व. बाळासाहेब विखे यांच्या विरोधात उत्तरेतून लोकसभेची निवडणूक लढविली. त्यावेळीही तालुक्यातील जनतेने त्यांना साथ दिली. आता नीलेश लंके हे दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असून या मतदारसंघातील श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, शहरी, नगर शहर तसेच पारनेर – नगर मतदारसंघ हे तालुके शरद पवार यांना मानणारे तालुके आहेत.

नीलेश लंके यांचा राज्यात संपर्क असून कोरोना काळात त्यांनी जीवावर उदार होउन केलेले काम हीच त्यांची ओळख आहे. संपूर्ण जिल्हयात त्यांचा व्यक्तीगत संपर्क आहे. लंके यांना विधानसभा निवडणूकीत साठ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तालुक्याची अस्मिता म्हणून लोकसभा निवडणूकीत लंके यांना एक लाखांहून अधिकचे मताधिक्य द्यावे असे आवाहन करताना दादा कळमकर यांनी अब की बार मताधिक्य एक लाख पार असा नारा दिला. टाळ्यांच्या कडकडाडात उपस्थितांनी कळमकरांच्या घोषणेस प्रतिसाद दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.