राहुरी, नगर आणि पाथर्डी तालुक्याचा मिळून राहुरी विधानसभा मतदारसंघ तयार होतो. गेल्या विधानसभेला आ. प्राजक्त तनपुरे यांनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा थोडक्यात पराभव केला असला तरी, आता शिवाजी कर्डीलेंनी ना. राधाकृष्ण विखेंच्या मदतीने या गटावर पुन्हा कमळ फुलविण्याचे मनसुबे आखले आहेत. शिवाजी कर्डीलेंचे नगर व पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणावर वर्चस्व आहेच, मात्र आता कर्डिलेंचे वजन राहुरी तालुक्यातही वाढले आहे.
राहुरी तालुक्यात सर्वसामान्य जनतेत आमदार म्हणून ओळख निर्माण केलेले नेते स्व.शिवाजीराजे गाडे पाटील यांचे चिरंजीव, बारागाव नांदूर गटाचे माजी जि.प.सदस्य धनराज गाडे पाटील व सात्रळ गटाचे माजी जि.प.सदस्य भास्करराव गाडे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत कर्डिलेंनी आ. तनपुरेंना ‘जोर का झटका’ दिला आहे. या दोन्ही गटातील नेते भाजपमध्ये आल्याने कर्डिलेंची ताकद वाढली आहे..
लोणी येथे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन मोठ्या नेत्यांचा प्रवेश झाल्याने आ.प्राजक्त तनपुरे यांना धक्का बसला असून राहुरी तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे भगदाड पडले आहे.