केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा मंगळवारी निकाल जाहीर झाला. या निकालात नागपुरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातून यंदा पाच विद्याथ्यांनी बाजी मारली. तर विदर्भातून नागपुरातील पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
नागपूरमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये समीर प्रकाश खोड़े (42), सुरेश बोरकर (658), मयूरी महल्ले (794), प्रांजली खांडेकर (761) व शुभम डोंगरदिवे ( 963) यांचा समावेश आहे.
प्रशासकीय सेवा केंद्रातून यंदा पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. केंद्राच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची दिल्ली येथे मुलाखतीची तयारी करून दिली जाते. केंद्राच्या वतीने यंदा 92 विद्यार्थ्यांनी मुलाखत दिली त्यातील 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे केंद्राचे संचालक डॉ. लाखे यांनी सांगितले.
समीर 551 वरून 42 व्या स्थानावर..
समीरने 2004 मध्ये पं. बच्छराज व्यास विद्यालयातून दहावीची परीक्षा व 2006 मध्ये शिवाजी सायंस महाविद्यालयातून बारावीची परीक्षा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण केली होती. यानंतर त्याने नागपुरच्या व्ही. एन. आय.टी. तून बी. टेकचे शिक्षण घेतले.
लखनऊच्या आयआयएममधून त्याने एमबीए पूर्ण केले व त्याची ‘ कॅट’साठी निवड झाली. 2019 मध्ये यूपीएससीमध्ये 551 व्या रँकवर असणाऱ्या समीरने 2023 च्या परीक्षेत 42 व्या स्थानावर मजल मारली. समीरचे वडील प्रकाश खोडे हे सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक असून आई गृहिणी आहे मोठा भाऊ प्रतीक खोडे ने 2022 मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. तसेच वहिणी पौर्णिमा ही चेन्नई येथे आयआरएसमध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहे..
शुभम डोंगरदिवेला आठव्या प्रयत्नात यश..
नागपूरच्या शुभम डोंगरदिवे यांना आठव्या प्रयत्नात यूपीएससीमध्ये यश मिळाले आहे. 2016 पासून या परीक्षेची तयारी करत होते. अभियांत्रिकी शिक्षण झाल्यावर यूपीएससीची तयारी केली. अनेकदा अपयश आले; परंतु मागच्या परीक्षेत झालेल्या चुका सुधारत पुढे गेलो. धीर खचू दिला नाही, म्हणून यशापर्यंत पोहोचू शकलो, असे शुभम डोंगरदिवे यांनी सांगितले.
प्रांजली खांडेकरला तिसऱ्या प्रयत्नात यश..
नागपूरच्या प्रांजली खांडेकरही तीन वर्षांपासून यूपीएससीची तयारी करत होत्या. पहिल्यांदाच मुलाखत दिली असून त्यांची निवडही झाली. आयआयटी खडगपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असले, तरी मनात यूपीएससीचा निधार यशापर्यंत घेऊन गेल्याचे त्यांनी सांगितले.
सुरेश बोरकरचे यश..
यूपीएससी परीक्षेत कळमेश्वर येथील सुरेश लीलाधर बोरकर याने 1016 विद्यार्थ्यांमधून 658 क्रमाक पटकावत यश संपादन केले. त्याने इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण कळमेश्वर येथील नगरपरिषदेच्या शाळेत पूर्ण केले. तर तालुक्यातील दहेगाव (रं) येथील गुरुनानक इंजिनीअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथून आपत्ती व्यवस्थापनात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला.