Samruddhi Mahamarg : कमी प्रदूषण, इंधनाची बचत, वेळेची बचत… ‘ही’ आहेत हायटेक मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गाची खासियत..
कोणत्याही देशाचा, शहराचा किंवा गावाचा विकास होण्यासाठी तेथील रस्ते कारणीभूत ठरत असतात. वाहतुकीसाठी रस्ते चांगले असतील तर परिसराचा विकासही अधिक चांगल्या प्रकारे होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले आहे. 520 किलोमीटर अंतर असलेला नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले आहे.
मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग सुमारे 55,000 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक असणार आहे, जो महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधून आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक अश्या प्रमुख शहरी भागांमधून जात आहे.
आधुनिक सोयी सुविधांनी समृद्ध अश्या या एक्स्प्रेस वेवर इलेक्ट्रिक वाहनांची सुद्धा पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येक 40 ते 50 किमी अंतरावर चार्जिंगची व्यवस्था असणार आहे. दोन्ही बाजूला सुरक्षा भिंत बांधली जात असणारा हा महामार्ग देशातील पहिला महामार्ग असणार आहे. राज्यातील सर्वात मोठ्या महामार्गावर 300 हून अधिक छोटे-मोठे पूल असणार आहेत. या मार्गावर 240 छोटे पूल, 54 उड्डाणपूल आणि 28 मोठे पूल बांधले जात आहेत.
नव्या उद्योगांना मिळणार चालना..
साहजिकच मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग कार्यान्वित झाल्याने दोन्ही शहरांमधील अंतर कमी होऊन व्यापारालाही गती येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक भक्कम होईल. आज उद्घाटन झालेल्या या महामार्गाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी ही शहरे जोडली जाणार आहे. सध्या या दोन शहरांमधील प्रवासाचा कालावधी 10 तासांचा आहे, तो थेट 5 तासांवर येणार आहे. या महामार्गाचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे असणार आहे. हा एक्स्प्रेस वे महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातून जाणार आहे.
लवकरच होणार भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे..
या महामार्गा व्यतिरिक्त लवकरच दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे सुद्धा बांधून तयार होणार आहे. हा महामार्ग पूर्णपणे तयार झाल्यावर त्याला भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग म्हटले जाणार आहे. 1380 किमी लांबीचा हा एक्स्प्रेस वे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जात आहे.
त्यामुळे दिल्ली ते मुंबई हा प्रवास केवळ १२ तासांत पूर्ण होणार आहे. सध्या दिल्ली ते मुंबई या प्रवासासाठी २४ तास किंवा त्याहून अधिक वेळ लागतो, मात्र तो पूर्ण झाल्यानंतर हा वेळ निम्म्याने कमी होईल. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग सध्या 8 लेनचा बनवला जात असला तरी तो 12 लेनपर्यंत वाढवता येणार आहे. त्यानुसार जमीनही संपादित करण्यात आली आहे.
काय असणार आहेत या नव्या महामार्गाची वैशिष्ट्ये :-
1- दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वेची पायाभरणी 9 मार्च 2019 रोजी झाली.
2- या महामार्गाच्या बांधकामात 12 लाख टन स्टीलचा वापर केला जाणार आहे.
3- एवढ्या स्टीलमध्ये 50 हावडा पूल बनवता येतील असे म्हटले जात आहे.
4- यामध्ये 35 कोटी घनमीटर माती आणि 80 लाख टन सिमेंटचा वापर केला जाणार आहे.
5- म्हणजे देशात वर्षभरात उत्पादित होणाऱ्या सिमेंटपैकी दोन टक्के सिमेंटचा वापर येथे होणार आहे.
6- हा एक्स्प्रेस वे बनवण्यासाठी सुमारे एक लाख कोटी रुपये लागणार आहेत. त्याची लांबी 1,382 किमी असणार आहे.
7- या महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, इंधनाच्या वापरामध्ये 32 कोटी लिटरने घट होईल.
8- यासोबतच 85 कोटी किलो कार्बन डायऑक्साइड (CO2) उत्सर्जनात घट होईल, जे चार कोटी झाडे लावण्याइतके आहे.
9- महामार्गावर दर ५०० मीटरवर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा असेल. यासोबतच द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला 40 लाख झाडे लावण्याचे नियोजन आहे.
10- हा एक्सप्रेस वे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जात आहे.